नवी दिल्ली:
निमलष्करी दलातील महिलांचा सहभाग आणखी वाढणार आहे. आपल्या ऐतिहासिक निर्णयात गृह मंत्रालयाने केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (CISF) पहिल्या महिला बटालियनच्या स्थापनेला मान्यता दिली आहे. राष्ट्रीय सुरक्षेत महिलांची भूमिका वाढवण्यासाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे. सध्या सीआयएसएफमध्ये महिलांचा सहभाग ७ टक्क्यांहून अधिक आहे.
या नव्या महिला बटालियनच्या निर्मितीमुळे महिलांना धैर्य आणि देशसेवेची संधी मिळणार आहे. यामुळे सीआयएसएफमधील महिलांनाही नवी ओळख मिळेल. याबाबत सीआयएसएफ मुख्यालयाने तयारी सुरू केली आहे.
बटालियनच्या नवीन मुख्यालयासाठी भरती, प्रशिक्षण आणि जागा निवडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या दलामध्ये महिलांना विशेष प्रशिक्षण दिले जाईल जेणेकरून त्या त्यांच्या जबाबदाऱ्या चांगल्या पद्धतीने पार पाडू शकतील. व्हीआयपी सुरक्षा, विमानतळांची सुरक्षा आणि दिल्ली मेट्रोसारख्या महत्त्वाच्या ठिकाणांच्या सुरक्षेची जबाबदारी या महिलांवर असेल.